सध्या पारंपरिक शेतीमधील वाढत्या अडचणी, बाजारातील अनिश्चित दर, बदलते हवामान आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे अनेक शेतकरी पर्यायी शेतीच्या दिशेने वळत आहेत. अशाच पर्यायी शेतीपैकी एक म्हणजे ‘सिंदूर शेती’, जी कमी जागेत, कमी मेहनतीत आणि फारच कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणारी शेती ठरू लागली आहे. ही शेती आता उच्च मूल्य असलेल्या पिकांच्या यादीत गणली जाते आणि अनेक शेतकरी या शेतीकडे आकर्षित होत आहेत.
सिंदूर म्हणजे ‘बिक्सा ओरेल्याना’ या वनस्पतीपासून मिळणारे उत्पादन. याच्या झाडांना लागणाऱ्या फळांमध्ये लहान बिया असतात आणि त्या बियांमधून नैसर्गिक रंग तयार केला जातो. हा रंग ‘Annatto’ या नावाने ओळखला जातो. हा नैसर्गिक रंग अन्नप्रक्रिया उद्योगात वापरला जातो. विशेषतः बटर, चीज, मिठाया आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. त्यामुळे सिंदूर या पिकाला वर्षभर बाजारात मागणी असते आणि दरही चांगला मिळतो.
सिंदूर लागवडीसाठी फार मोठ्या भांडवली गुंतवणुकीची गरज नसते. याचे रोप प्रत्यक्षात ४ ते ५ रुपयांत उपलब्ध होते आणि एका एकरात सुमारे ४०० झाडे लावता येतात. झाडे लागवडीनंतर दोन वर्षांत उत्पादन द्यायला सुरुवात करतात आणि सात ते आठ वर्षांपर्यंत सातत्याने उत्पन्न देतात. एका झाडापासून वर्षाला सरासरी १.५ ते २ किलो बिया मिळतात. सध्या बाजारात या बियांना ४०० ते ६०० रुपये प्रति किलो दराने मागणी आहे. म्हणजेच एका झाडापासून वर्षाला सरासरी ७५० ते १२०० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. जर ४०० झाडे एक एकरात असतील, तर त्यातून वर्षाला दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळू शकते. विशेष म्हणजे हे सर्व उत्पन्न फारशा देखभालीशिवाय मिळते.