Mumbai Weather Alert:- महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून आता पुन्हा सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, १२ जूनपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई, पुणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
मुंबईत येत्या काही दिवसांत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही भागांत गडगडाटासह मुसळधार सरी पडतील. उपनगरांमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरवासीयांनी पावसाळी तयारी पूर्ण ठेवावी आणि आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे.